रनपसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुकांची पाठ

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अजं दाखल झालेला नाही. रत्नागिरीत महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेकजण उमेदवारी मिळण्याची आस बाळगून आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून शेवटच्या दिवसापर्यंत कितीजण अर्ज दाखल करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
रनपच्या अडीच ते तीन वर्षानी होणाऱ्या या निवडणुकीवर वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात स्थानिक परिस्थिती पाहून युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पक्षात बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसात उमेदवार जाहीर करण्याचे धोरण ठरवले आहे.

त्यातच अनेक इच्छूकांनी नगर परिषदेमध्ये घरफळा भरण्यासाठी आणि आपण नगर परिषदेमध्ये ठेकेदार नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात कुणी स्वारस्य दाखवले नाही. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे असून, त्यानंतर त्याची प्रिंट काढून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणून द्यायची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.

शिवसेना युतीकडून भाजपानेही नगराध्यक्षपदाची मागणी केली आहे. शिवसेनेनेही आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच शिवसेना उबाठाकडून शिवानी सावंत-माने यांच्या नावाची चर्चा असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मात्र इच्छूकांनी पाठ फिरवली आहे.