चिपळूण शहरात २१ हजार ५९६ महिला मतदार
चिपळूण:- नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळुणात निवडणुकीसाठी ४२ हजार ५८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष २० हजार ९८६ तर २१ हजार ५९६ महिला मतदार असून, महिला मतदार चिपळूणचा नगराध्यक्ष ठरवणार आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागरिकांमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. चिपळूण शहरामध्ये एकूण १४ प्रभाग असून, २८ नगरसेवक निवडून येणार आहेत. नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. शहरात प्रशासन ४८ मतदान केंद्र उभारणार आहे. १० तारखेपासून नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते. निवडणुकीच्या काळात नागरिकांसह उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले. निवडणुकीसाठी कर्मचार्यांची १९ पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पाच फिरती पथके तर शहराच्या हद्दीवर पाच ठिकाणी चेकनाके तयार केले जाणार आहेत. यामध्ये कापसाळ, पेढे, कळंबस्ते, खेर्डी, गुहागर बायपास, गांधारेश्वर आदी ठिकाणांचा समावेश आहे याशिवाय दोन फिरती पथके तैनात असणार आहेत.
निवडणुकीसाठी शहरात एक सखी मतदान केंद्र तर दुसरे आदर्श मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व जिल्हा प्रशासन शस्त्रे ताब्यात घेणार आहेत. रात्री १०च्या आत प्रचार थांबवावा लागेल याशिवाय ३० नोव्हेंबरला प्रचाराची मुदत संपणार असून, १० पर्यंतच सार्वत्रिक प्रचार करता येणार आहे. २ ला मतदान होणार आहे.
चौकट
मतमोजणी युनायटेड स्कूलमध्ये
मतमोजणी ३ डिसेंबरला शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे होणार आहे. त्याच ठिकाणी स्ट्राँगरूम तयार करण्यात येणार असून, मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येतील. त्यानंतर ३ रोजी सकाळी १० पासून मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारी १ पर्यंत सर्व निकाल जाहीर होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे यांनी सांगितले.









