रत्नागिरीत मनसेकडून इच्छुकांची चाचपणी

रत्नागिरी:- आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून इच्छुक असलेल्यांचा आज पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच आपापल्या प्रभागातील लोकहिताची आणि लोकांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी काम करत राहण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शहर कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, मनविसेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ आदींसह शहर उपाध्यक्ष राजेश नंदाने, राहुल खेडेकर, इम्रान नेवरेकर, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे घेण्यात आली. या वेळी अनेकांनी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे तसेच आघाडी किंवा अन्य निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहेत, असे श्रीनाथ यांनी सांगितले.