चिपळूणमधील ४०० दुबार नावे हटवली

चिपळूण:- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दुबार किंवा तिबार नावे कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चिपळूणमधील मतदार यादीतील ४०० दुबार नावे हटवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. चिपळूण शहरातून पंधराशे अर्ज आले होते. त्यातील अकराशे अर्ज चुकीचे आहेत तसेच मतदार यादीत चारशे दुबार नावे आढळली. गुहागरमध्ये ७५ नावे दुबार आढळली आहेत. ही नावे हटवण्यात आल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून अंतिम परीक्षण केल्यानंतर नगरपालिकांच्या मतदार याद्या अद्ययावत होणार आहेत. ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दोन किंवा तीनवेळा आली आहेत त्यांच्या नावाच्यापुढे दोन स्टार करण्यात येणार आहेत. दोनवेळा मतदार यादीत आलेली नावे एकाच ठिकाणी ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीतील उमेदवारांना खर्च करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामध्ये ब वर्ग नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी ११.२५ लाख तर सदस्यपदासाठी ३.५ लाखांची मर्यादा आहे तर क वर्ग नगर परिषद अध्यक्षपदासाठी ७.५ लाख तर सदस्यपदासाठी २.५ लाख खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आचारसंहितेचे पालन करावे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी झाली आहे. मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रसारसभांसाठी आधीच परवानगी घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींचे प्रभागामध्ये नाव आहे त्या ठिकाणी मतदान करण्यास परवानगी आहे. त्या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींना इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर जाण्यास परवानगी नाही. आकाश लिगाडे, प्रांताधिकारी चिपळूण