अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी वाढणार; प्रचाराला फक्त चार दिवस

चिन्ह घराघरात पोहचवण्याचे आव्हान

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगूल अखेर वाजले आणि 4 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणूकांना ३ डिसेंबरचा मुहूर्त मिळाला. मात्र ही निवडणूक अपक्ष उमेदवारांसाठी सर्वात डोकेदुखीची ठरणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबरला प्रचाराची मुदत संपणार आहे. चार दिवसात चिन्ह जनतेपर्यंत कसे पोहचवायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे.

निवडणूक आय़ोगाने जाहीर केल्याप्रमाणे सर्वच ठिकाणी मतदानाची तारीख ही दोन डिसेंबर असल्याने सर्वच ठिकाणचा प्रचार ३० नोव्हेंबरला थंडावेल. मात्र त्याचवेळी प्रचाराचा अवधी नेमका किती याचा शोध घेतल्यावर उमेदवारांची अवस्था रात्र थोडी सोंगे फार अशीच आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना हरकत नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर, तर हरकत असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या स्थितीत उमेदवाराच्या हातात प्रचारासाठी केवळ चार दिवस उरतील, अशी स्थिती आहे.

ज्या ठिकाणी हरकती दाखल होतील तेथे उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २५ नोव्हेंबर आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होईल. नगरपरिषद निवडणुकीचा विचार करता मोठ्या संख्येने हरकती दाखल होत असतात. या स्थितीत उमेदवाराला प्रभागात प्रचार करण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी हाती राहणार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता उमेदवारांना चार दिवसात वॉर्डात प्रचार करण्याचे आव्हान मात्र घाम फोडणारे आहे.