आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार: रवींद्र चव्हाण

चिपळूण:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत.असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांनी कामाला लागण्याचे आदेश ही कार्यकर्त्यांना दिले.मात्र २०२९ ला शतप्रतीशत भाजपसाठी प्रशांत यादव तुम्ही तयार रहा,असे सूचक संकेतही त्यांनी दिले.यावेळी सुमारे ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.त्यासर्वांचे आम.रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण बुधवारी कोकण दौऱ्यावर आले असता चिपळूणमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी परशुराम घाटातून बाईक रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व पुष्यवृष्टी करण्यात आली.भाजप नेते प्रशांत यादव तसेच सौ.स्वप्ना यादव यांनी पुष्पगुच्छ देत आम.रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती.
भाजप नेते प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.पूर्ण ताकदीने सर्वजण काम करत आहेत.आपले पाठबळ आम्हाला हवे आहेत.आगामी निवडणुकांसाठी आपल्याकडून जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.शतप्रतिशत भाजपचा निर्णय घेतला गेला तरी आमची पूर्ण तयारी आहे.आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण म्हणाले प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये आलो आणि येथे झालेला पक्षप्रवेश बघून प्रचंड आनंद झाला.येथे ३०० कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला,माझ्या मते चिपळूण च्या ग्रामीण भागातील असंख्य गावे आज भाजपला जोडली गेली हे मी विश्वासाने नमूद करत आहे.प्रशांत यादव यांच्या माध्यमातून आपण सर्वजण भाजपच्या प्रवाहात आला आहात.तुम्हाला एक विश्वास देतो या पुढे तुम्हाला पूर्ण सन्मान दिला जाईल.तुम्ही जो विश्वास पक्षावर दाखवला आहात त्याला तडा जाऊ देणार नाही.प्रत्येकवेळी तुमच्या पाठी मी खंबीर उभा असेन असा विश्वास त्यांनी यावेळी प्रवेशकर्ते कार्यकर्त्यांना दिला.

भाजप हा विचारधारेचा पक्ष आहे.राष्ट्र प्रथम हे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पारदर्शकपणे कारभार करून देश प्रगतीपथावर नेत आहेत.आपण देखील तीच विचारधारा पुढे घेऊन जायचे आहे.समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधून आपले विचार,पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास हा जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे.ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.असेही आम.रवींद्र चव्हाण म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी देखील त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली.खालपासून वरपर्यंत एकाच विचारधारेची सत्ता असली पाहिजे,त्या अनुषंगाने आगामी निवडणूका या महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या आहेत.नगरसेवक असो ,नगराध्यक्ष असो किंवा जिल्हापरिषद अध्यक्ष असो,हे महायुतीचेच असले पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी कामाला लागा.असे स्पष्ट आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.मात्र २०२९ ला शतप्रतिशत चा नारा देण्यासही ते विसरले नाहीत.

२०२९ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शतप्रतिशतचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे प्रशांत यादव तुम्ही २०२९ साठी तयार रहा असे सूचक संकेतही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.यावेळी सौ.स्वप्ना यादव यांच्या कामाचे देखील आम.रवींद्र चव्हाण यांनी तोंडभरून कौतुक केले.फक्त प्रशांत यादवच नव्हे तर यादव मॅडम देखील भाजप परिवारात सक्रियपणे काम करत आहेत याचा आम्हाला अभिमान असून आता चिपळूण बाबत चिंता करण्याचे कारणच नाही असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सुमारे ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला.या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.यावेळी माजी आमदार विनय नातू,माजी आमदार सूर्यकांत दळवी,जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,सतीश मोरे,खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण,जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले.तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.