रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे. या प्रकरणात जवळपास १६० कोटी रुपयांच्या किमतीची जमीन फक्त ४० ते ४५ कोटी रुपयांत विकण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
माने यांनी सांगितले की, “रत्नागिरीत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सिंघानिया ग्रुपचा जे.के. फाईल्स हा कारखाना उभारण्यात आला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी कामगार संघटना आणि मालकांच्या संगनमताने हा कारखाना बंद करण्यात आला. त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले, आणि त्यानंतर या साडे सोळा एकर जमिनीचा कवडीमोल भावात व्यवहार करण्यात आला.”
माने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “या संदर्भात आम्ही उद्योग विभागाचे सचिव आणि सल्लागार यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
माने पुढे म्हणाले, “ही जमीन औद्योगिक उद्देशाने देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी व्यावसायिक किंवा निवासी प्रकल्प उभारणे चुकीचे ठरेल. या जागेवर नव्या उद्योगाची स्थापना करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.”









