‘त्या’ ठिकाणी कम्युनिटी सेंटर नसून बौद्धविहारच होणार

पालकमंत्री उदय सांमत यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी:- बौद्धविहार व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून बौद्धसमाजाची मागणी होती. गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा या जागेबाबतची प्रक्रिया सुरू झाली. शंभूराज देसाई मंत्री झाले तेव्हा अर्ध्या तासाच्या बैठकीत ही साडेसतरा गुंठे जागा देण्यात आली. दिमाखात बौद्धविहार व्हावे, यासाठी ८ कोटी मंजूर झाले. तांत्रिक अडचणीमुळे त्याला कम्युनिटी सेंटर म्हटले आहे. परंतु त्याचे नाव बौद्ध विहारच असुन तिथे बौद्धविहारच होणार, असे पालकमंत्री उदय सांमत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट
केले.

पाली निवास्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बौद्ध समाजाचे एम. बी. कांबळे व अन्य उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून या प्रार्थनास्थळावर होऊ घातलेल्या बौद्धविहार आर्थात कम्युनिटी सेंटरवरून बौद्ध समाजामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाला येथे बौद्धविहार व्हावी, अशी मागणी केली आहे. तर दुसऱ्या गटाने याला विरोध केला आहे. बौद्ध समाजाचे हे प्रार्थनास्थळ असून त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. कम्युनिटी सेंटर झाल्यास ते पावित्र्य राहणार नाही, असा आक्षेप घेऊन याला विरोध केला आहे. त्यासाठी २७ तारखेला मोर्चाही काढण्यात येणार आहे. हा वाद चिघळल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

उदय सामंत म्हणाले, थिबा राजवाडापासून तीन किमी अंतरावर पोलिस अधीक्षक कार्यालय असून त्याच्या मागच्या बाजूला प्रार्थनास्थळ आहे. सभा, जयंती, बुद्ध पौर्णिमा असे अनेक कार्यक्रम तिथे झाले. बौद्ध समाजाच्या मागणीवरून याचा प्रस्तावाला जोर दिला. गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा सुरवात झाली. शंभूराज देसाई या विभागाचे मंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अर्ध्या तासाच्या बैठकीत ही जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली. त्यासाठी ८ कोटी निधी मंजूर असून भुमिपूजनाचा मोठा सोहळा झाला. त्याचे नाव बौद्ध विहारच असणार आहे. जिल्हा नियोजनच्या पैशासाठी फक्त कम्युनिटी सेंटर असे म्हटले होते. नाव बौद्धविहारच असणार तेथे देशात कुठेही नाही, असे बौद्धविहार उभे राहील. काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली. न्यायालयानेसुद्धा सांगितले की बौद्ध विहारच होणार आहे. बौद्ध विहाराची मालकी कोणाकडे दिली जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती नेमण्यात येईल. यामध्ये प्रत्येक गटातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असले.

पालीत आंबेडकरांचे स्मारक

पाली येथे अनेक लोकांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता. त्या ठिकाणी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर फेक नेरेटिव्ह पसरवून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम काही असंतुष्ट लोक करत आहेत. परंतु ते राजकीयदृष्ट्या कधी यशस्वी झाले नाहीत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

महायुतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून सूचना

धंगेकर प्रकरणावरून महायुतीत वाद असणं अयोग्य आहे. महायुतीत मीठाचा खडा पडू नये, यासाठी शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन सर्व करतील आणि महायुती अबाधित राहिल. सांगलीतील डॉक्टर मुलीची आत्महत्या हा गंभीर प्रकार आहे. पोलिस यंत्रणा गुन्हेगाराला शोधुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. परंतु अत्याचार केले त्यांना पाठीशी घालू नये, असे सामंत यांनी स्पष्ट केले.