‘एआय’च्या माध्यमातून तयार केला होता व्हिडिओ
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बिबट्याचे छायाचित्र प्रसारित झाल्याचे समोर आले आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या आठ दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपवर गांग्रई येथे चार बिबट्यांचा कळप दिसला’ असा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात होते.
प्रत्यक्षात मात्र ते छायाचित्र एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आले असून, परिसरातील नागरिक आणि वन विभागाकडे बिबट्या दिसल्याची कोणतीही नोंद नाही. चिपळूण तालुक्यात बिबटे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. काही दिवसापूर्वी निर्वाळ येथे दुचाकीने जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला.
कळंबट येथे मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. शिरगाव तळसर येथील जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व समोर आले आहे. तालुक्यात कुठे बिबट्या विहिरीमध्ये पडलेला आढळतो. कुठे फासकीत अडकतो तर एखाद्या गावात कुत्री आणि गुरांची शिकार करून आपले अस्तित्व मानवी वस्तीत असल्याचे दाखवीत आहे. याचा गैरफायदा घेत गांग्रई गावच्या रस्त्यावर चार बिबट्यांचा कळप मुक्त संचार करीत असल्याचा व्हिडिओ टाकण्यात आला.
वन विभागापर्यंत याची माहिती भेटल्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी सर्वर खान यांनी ग्रामस्थांकडे चौकशी केली असता हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, मात्र समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नये, असे आवाहन खान यांनी केले.