बाळ माने यांचा आक्षेप, सदोष यादी प्रसिद्ध करण्याची मागणी
रत्नागिरी:- आगामी रत्नागिरी पालिका निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये एकूण ६४ हजार ७६८ मतदारांपैकी १ हजार ३२ एवढी मतदारांची नावे दुबार आहेत. ती एका ठिकाणी करावी. ग्रामीण भागातील मतदारदेखील शहरी भागात लागले आहेत. त्याची दुरुस्ती करावी, मयत मतदारांची नावे वगळावीत, अशी तक्रार निवडणूक विभाग आणि आयोगाकडे केली आहे. निवडणूक विभागाने याबाबत दिलेली मुदत वाढवून सदोष यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
मुख्याधिकारी गारवे यांची भेट घेऊन मतदार यादीबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. या वेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बाळ माने यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदारांची बोगस नावे असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत त्यांनी यादीची झेरॉक्स काढून ती निवडणूक विभागाला सादर केली आहे. सोमवारी पुन्हा त्यांनी रत्नागिरी शहराच्या मतदार यादीबद्दल आक्षेप नोंदवला.
ते म्हणाले, शहराची प्रारूप यादीची तपासणी केली तेव्हा लक्षात आले की, ६४ हजार ७६८ मतदारांपैकी १ हजार ३२ मतदारांची नावे दुबार आहेत. ही नावे एका ठिकाणी करावीत. ३३ हजार ९१५ मतदार असे आहेत की, ते जिथे राहतात तिथे त्यांचे मतदान नसून दुसऱ्या ठिकाणी आहे. त्यामुळे मतदानादिवशी नेमके केंद्र कुठे आहे, याचा गोंधळ होतो. ते ज्या केंद्रावर जातात तिथे त्यांचे यादीत नाव नसते. त्यामुळे जिथे वास्तव्य आहे तिथे त्यांची नावे असावीत; परंतु ही प्रक्रिया करण्यासाठी वेळ कमी आहे. त्यासाठी फॉर्म बी भरून द्यावा लागणार म्हणून निवडणूक आयोगाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आहे. यादीमधील मयतांची नावे अजून वगळण्यात आलेली नाहीत, ती वगळण्यात यावीत.
अंतिम यादी प्रसिद्ध करू नये
ग्रामीण भागातील अनेक मतदारांची नावे शहरात आहेत. त्यामध्येही दुरूस्ती करावी. पालिका निवडणुकीला सामोरे जाताना जोवर मतदार यादी सदोष होत नाही तोवर अंतिम यादी प्रसिद्ध करू नये, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी सांगितले.