रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यात २८ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के आरक्षणानुसार १५ जागा राखीव ठरविण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीचा शुभारंभ लहान बालक श्रेयांश कुर्णे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोडतीच्या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अप्पर तहसिलदार सचिन गोसावी प्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण आरक्षण सोडत संगणकीय पद्धतीने आणि पूर्ण पारदर्शकतेने करण्यात आली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, ही प्रक्रिया नियमबद्ध, सर्वसमावेशक आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. या आरक्षण प्रक्रियेमुळे विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार असून महिलांना मिळालेल्या २८ जागांमुळे महिला नेतृत्वाच्या वाढीसाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे.
सोडतीनंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, सर्वसाधारण प्रवर्गात केळशी, कोतवडे, उमरोली, खालगाव, जालगाव, बाणकोट, कोळबांद्रे, भिंगरोळी, कोंसुंब, कडवई, गोळप, धामापूर-तर्फे-संगमेश्वर, वडदहसोळ, धोपेश्वर, दयाळ, कोकरे, आजगोली, दाभोळे, गवाणे आणि पावस या गटांचा समावेश आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी कळवंडे, पेढे, धामणदेवी, साटवली, खेडशी, आसगे, वहाळ, खेर्डी, कसबा संगमेश्वर, भांबेड, मुचरी साखरीनाटे, कातळी, साडवली, सावर्डे, झाडगाव (म्यु. बाहेर) आणि वेळणेश्वर या गटांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मतदारसंघांमध्ये जुवाटी, कर्ला, पडवे, भडगाव, शृंगारतळी, सुकीवली आणि नाचणे यांचा समावेश आहे, तर ओबीसी महिला प्रवर्गात लोटे, कोंडकारुळ, भरणे, दाभोळ, शिरगाव, अलोरे, विराची वाडी आणि पालगड या गटांचा समावेश आहे. अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी हातखंबा, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी वाटड आणि अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी हर्णै या गटांची निवड झाली आहे.
ही सोडत प्रक्रिया पार पडताच जिल्हाभरातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात केली असून अनेक संभाव्य उमेदवारांनी पुढील निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. यंदा महिलांना मिळालेल्या भरघोस संधीमुळे जिल्हा परिषदेत महिला नेतृत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासनाने अत्यंत पारदर्शकतेने, संगणकीय प्रणालीचा वापर करून ही आरक्षण सोडत केली. यावेळी उपस्थित नागरिक, जनप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते यांनी प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. या सोडतीनंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर लागले असून, राजकीय समीकरणे नव्या घडामोडींना सुरुवात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.