रत्नागिरी:- रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे रत्नागिरीत पुन्हा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडशी परिसरात 30 सप्टेंबर रोजी रात्री रस्त्यात सुरू असलेल्या बैलांच्या मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून खाली पडलेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
धैर्यशिल सदाशिव देसाई (34, रा. खेडशी नाका भवानी नगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 30 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता धैर्यशिल आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. रस्त्यात अचानक दोन बैलांची झुंज सुरू असल्यामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तोल जाऊन तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.
अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, शुक्रवारी (10 ऑक्टोबर) उपचारादरम्यान धैर्यशिल देसाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील व महामार्गावरील मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून, या जनावरांच्या अचानक रस्त्यावर येण्यामुळे किंवा त्यांच्या झुंजीमुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.