जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी 30 सप्टेंबरला आरक्षण सोडत

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिलेकरिता राखीव झाल्यानंतर आता जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात 30 सप्टेंबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. मुंबईत झालेल्या सोडतीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला यासाठी राखीव झाले होते. आता जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची पदे नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोडत काढण्यात येईल असे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र), चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या एका प्राधिकृत प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.