शिवसेना उबाठाकडून महावितरणवर दणदणीत मोर्चा
रत्नागिरी:- स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचे षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये कमीतकमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने जिल्ह्यात वर्षाला 180 कोटींची लूट होणार आहे. यातील पैसा अदाणीच्या घशात जाणार असून, हे वीजमीटर चोरीछुपे बसवले जात असून, यापुढे अशापध्दतीने वीज मीटर बसवणार्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशारा शिवसेना उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला. स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे थांबले नाही तर पुढील मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचेही त्यांनी जाहीर केले.
महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर विरोधात उबाठाच्यावतीने मंगळवारी माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयातून महावितरणच्या कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वत: माजी खासदार विनायक राऊत मोर्चात आघाडीवर होते. यावेळी शिवसेना उबाठाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, राजापूरचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, देवरुखचे छोट्या गव्हाणकर, तात्या सरवणकर, माजी जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, माजी नगरसेविका रशिदा गोदड, महिला संघटक ममता जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उबाठाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महायुतीसह महावितरणच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. वीज मीटर चोरीछुपे बसवले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
महावितरणच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर माजी खा. विनायक राऊत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या स्मार्ट मीटरच्या बाबतचा पहिला आवाज दोन वर्षांपूर्वी मी या रत्नागिरीमध्ये उचलला होता त्यावेळेला मी खासदार होतो. महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमध्ये फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे या सरकारने आणि वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्राधान्याने घेतले. त्यावेळेला सुद्धा मी विरोध केला होता आज सुद्धा तोच विरोध कायम आहे. यापूर्वी मीटरच्या बाबत तक्रारी होत्या पण महाराष्ट्रात सरकारच्या विविध वितरण कंपनीने बसवलेल्या मीटर चुकीची रीडिंग करायचा पण त्याच्यावर आमचा विश्वास होता. पण या स्मार्ट मीटरची आयडिया आहे या राज्यकर्त्यांची नाही आहे. पंतप्रधानांची नाही, मुख्यमंत्र्यांचे नाही तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणारे ज्यांचे नाव तुम्ही ऐकलं असाल त्या अदाणीच्या मार्फत त्या स्मार्ट मीटरची निर्मिती केली गेलेली आहे आणि अदानी केवळ संपूर्ण महाराष्ट्र लुटायला बसलाय. एवढेच नव्हे तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यातल्या शेकडो एकर जमिनी गोरगरिबांच्या दलालाने बोगस खरेदीखत करून केव्हा लुटल्या लोकांना माहिती पडलं नाही, हे आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी महावितरणच्या अधिकार्यांना भेटून निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसवणे बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.









