रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गातील ४७० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता सातव्या टप्प्यातील बदल्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांमधील संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश होता. त्याचबरोबर संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्रसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले, तसेच संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला. एकाच शाळेत ५ वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला.
या बदली प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील आतापर्यंत ४७० शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याने आता एकाच शाळेत ५ वर्षे पूर्ण न झालेल्या शिक्षकांना या अवघड क्षेत्रात जावे लागणार आहे. न्यायालयात ही शिक्षक त्या विरोधात गेले होते. मात्र, ही स्थगिती उठविण्यात आल्याने सातव्या टप्प्यातील बदलीची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांना जावे लागणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सायंकाळी उशिरा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याने ते शिक्षक बदली झालेल्या शाळेवर सोमवारी हजर होणार आहेत.