संगमेश्वरमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या

देवरुख:- पत्नीपासून घटस्फोट घेतल्याच्या तणावाखाली एका ४२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द गावात घडली आहे. संतोष विठोबा जागुष्टे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ या वेळेत तुरवटे-ओझरे येथील एका खणीतील पाण्यात आढळून आला.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (अ.मृ.क्र. २७/२०२५). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. या कौटुंबिक कलहामुळे संतोष मानसिक तणावाखाली होता. तो कामावर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला आणि त्याने तुरवटे-ओझरे खणीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले.

संतोषचा मृतदेह ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता खणीच्या पाण्यात तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.