कुंभारखणी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या अडकला बाथरूममध्ये

वन विभागाच्या टीमने केली सुटका

रत्नागिरी:- कुत्र्याचा पाठलाग करताना अचानक एका बिबट्याचा गोंधळ उडाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. येथील मौजे कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथील एका घराच्या बाथरूममध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्या आणि कुत्र्याची सुरक्षित सुटका केली.

ही घटना आज, २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.३० वाजता घडली. कुंभारखणी खुर्द येथील रहिवासी श्री ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये एका बिबट्याचा पाठलाग करत असताना कुत्रा आणि बिबट्या दोघेही आत अडकले. ही बाब लक्षात येताच, कुंभारखणी खुर्दचे पोलीस पाटील श्री रवींद्र महाडिक यांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाऊले उचलली. परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी श्री न्हानू गावडे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, बाथरूममध्ये कुत्रा आणि बिबट्या दोन्ही अडकल्याची खात्री झाली. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभागाने अत्यंत सावधगिरीने काम केले. त्यांनी बाथरूमच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला लाकडी फळ्या लावून तो भाग बंद केला आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.

वन विभागाच्या टीमच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर, बाथरूममध्ये अडकलेला कुत्राही सुखरूप बाहेर आला.

वन विभागाने पकडलेल्या बिबट्याची तपासणी पशुधन विकास अधिकारी श्रेणी १, श्री सूर्यकांत बेलुरे यांनी केली. बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ८ ते ९ वर्षे आहे. तपासणीनंतर तो पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
या बचावकार्यात परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी श्री. न्हानू गावडे यांच्यासह वनरक्षक श्री आकाश कडूकर, श्री. सहयोग कराडे, श्रीमती सुप्रिया काळे, श्री सुरज तेली, श्रीमती शर्वरी कदम, पोलीस पाटील श्री रवींद्र महाडिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी-चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वी बचावकार्य पूर्ण करण्यात आले.
यावेळी विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास, वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.