उद्यमनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

रत्नागिरी:- उद्यमनगर येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आईने ओरडल्याच्या रागातून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

​रेहान अस्लम कापडी (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो उद्यमनगर येथील एका कॉन्व्हेंट शाळेत इयत्ता १० वी अ मध्ये शिकत होता. नुकत्याच झालेल्या युनिट टेस्टमध्ये त्याला कमी गुण मिळाले. याच कारणामुळे त्याच्या भविष्याची चिंता वाटल्याने आई त्याला रागावली. आई रागावल्यानंतर त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

रेहानला एक बहिण असून त्याचे वडील सी-मॅन म्हणून नोकरी करतात. परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.