रत्नागिरी:- मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळ एका बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज चव्हाण, रेल्वे पोलीस, रत्नागिरी यांनी परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी, प्रकाश सुतार यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच प्रकाश सुतार यांनी आपल्या स्टाफसह रात्री ११:०० वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, मृत बिबट्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेला आढळून आला. बिबट्याच्या शरीराची तपासणी केली असता, त्याची मान धडावेगळी झाली होती, खालचा जबडा तुटला होता आणि उजवा डोळा बाहेर आला होता. हा बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे वय अंदाजे दोन ते तीन वर्षे असल्याचे दिसून आले.
वनविभागाने मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि याबाबत माननीय विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती गिरीजा देसाई, तसेच सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती प्रियंका लगड यांना माहिती दिली.
शुक्रवारी, २५ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांच्यामार्फत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत बिबट्याचे शरीर सर्व अवयवांसह जाळून नष्ट करण्यात आले.
या बचावकार्यात रेल्वे पोलीस विभागाचे सतीश विधाते (पीआय, आरपीएफ), आर. एस. चव्हाण (एएसआय), प्रवीण कांबळे (कॉन्स्टेबल), अमर मुकादम, कमलेश पाल, व्ही. एस. पवार, तसेच निसर्गप्रेमी रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव उपस्थित होते. वनविभागाकडून परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल पाली, न्हानू गावडे आणि वनरक्षक रत्नागिरी, शर्वरी कदम यांनी सहभाग घेतला.
सदर बचावकार्य माननीय विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती गिरीजा देसाई, तसेच सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.









