रत्नागिरी:- राज्य शासनाकडून गोरगरीब, गरजू, मजुरांना कमी पैशात पोटभर जेवण मिळावे म्हणून 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. कोरोनापूर्वी आणि कोरोनात ही थाळी मजूर, गोरगरिबांची आधार बनली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांना उतरती कळा लागली असून आतापर्यंत 14 शिवभोजन केंद्र बंद झाली आहेत, तर 12 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे अनुदान मागील़ चार महिन्यांपासून थकले आहे. जर सरकारने अनुदान लवकरात लवकर न दिल्यास शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या स्थितीत आहेत.
कमी किंमतीमध्ये गरिबांना भोजन मिळावे म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली होती. या थाळीचा लाभ रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील गोरगरीब, कामगारांनी घेतला. कोरोना काळात तर राज्य सरकारकडून मोफत थाळी देण्यात आली होती. राज्यात कडकडीत बंद असताना ही शिवभोजन केंद्रे सुरू होती. त्यामुळे गोरगरिबांची उपासमार झाली नाही. दरम्यान, कोरोनानंतरची परिस्थिती बदलली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 26 केंद्र आहेत. यापैकी 14 केंद्र बंद झाली, तर केवळ 12 केंद्रे सुरू आहेत. चार महिन्यापासून केंद्रचालकास अनुदान न मिळाल्यामुळे थाळीचा केंद्रचालक अडचणीत आला आहे. दररोज दीड हजाराहून अधिक लाभार्थी शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत. दरम्यान, शिवभोजन केंद्र चालकास 40 रूपये अनुदान दिले जाते मात्र हे अनुदान मागील चार महिन्यापासून मिळत नसल्याचे चित्र आहे. आता 12 केंद्रांचा निधी थकल्यामुळे ही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
लाडकी बहीण योजनेचा फटका
राज्य सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना 1500 रूपये जाहीर केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे विविध योजनांना याचा फटका बसत आहे. शिवभोजन केंद्रांनाही याचा फटका बसला असून मागील चार महिन्यापासून केंद्र चालकांना अनुदान प्राप्त झाले नाही.
रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे मंजूर असून, त्यापैकी 12 केंद्रे सुरळीत आहेत. उर्वरित केंद्रासाठी वरिष्ठ कार्यालयांकडे अहवाल पाठविला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.