भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी

संगलट:- दापोली तालुक्यातील दाभोळमधील वनकर मोहल्यात सध्या उनाड कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उनाड कुत्र्यांनी वनकर मोहल्यातील मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आयात सुरकोजी (वय 5) असं जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.

ट्यूशनला जात असताना मुलीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला असून आयात सुरकोजी गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखम एवढी भीषण आहे की मुलीच्या डोक्याला 25 टाके पडले आहेत. भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि हल्ल्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुलीने कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारी असलेल्या घरातील लोकांनी कुत्र्यांना पिटाळून तिची सुटका केली. तिच्या पायावर आणि डोक्याला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली.

तिला उपचारासाठी येथील दाभोळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुलीवर दापोलीत उपचार सुरू आहेत.

गेल्या चार दिवसांपूर्वीही याचरिसरात एका कमर सुरकोजी यांच्यावरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, परंतु प्रसंगावधान राखून ते बचावले आहेत. दाभोळ ग्रामपंचायतने तातडीने कारवाई करण्याची मागणी सध्या दाभोळमधील नागरिकांनी केली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने, ग्रामपंचायतने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.