भाट्ये खाडीमुखाजवळ गाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून अंधातरी

रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये खाडीमुखाजवळील गाळाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून अंधातरी राहिला आहे. पुढील हंगामात येथील गाळ काढला जाईल की नाही याचीही शाश्वती मच्छीमारांना दिसत नाही. मत्स्य व्यवसाय विभागाने याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काजळी नदी म्हणजे भाट्ये खाडीमधून शेकडो मच्छीमारी नौका समुद्रात ये-जा करीत असतात. राजिवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप, नवा फणसोप येथील मच्छीमार आपल्या नौका भाट्ये खाडीतून समुद्रात नेत असतात. मागील अनेक वर्षापासून भाट्ये खाडीमुखाजवळील गाळाचा प्रश्न जठील बनला आहे. भाट्ये ते मांडवी दरम्यान, ओहटीच्या वेळ लांबचलांब वाळुचा पट्टा पाण्याबाहेर उघडा पडतो. मागील तीन-चार वर्ष या खाडीचा वापर करणारे मच्छीमार सातत्याने गाळ उपशासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील आहे. हा गाळ उपसा करण्याबाबत सातत्याने पालकमंत्र्यांसह, आमदार, खासदार व संबंधित मंत्र्यांची भेट घेत होते. त्यांच्याकडून गाळ काढण्याचे आश्वासनही मिळाले होते. गाळ काढण्यासंदर्भात प्रस्तावही पाठवण्यात आले होते. परंतु या गाळाच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही.
या भागात सँण्डबार तयार होत असल्याने भरतीच्यावेळीच नौका खाडीत घालाव्या लागतात. त्यामुळे भरती सुरु झाली की, खाडीत घुसण्याच्या प्रयत्नात काही नौका उलटून बुडाल्या असून, खलाशांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे गाळाचा उपसा करण्याबाबत येथील मच्छीमार आग्रही आहेत.

या ठिकाणी अनेक वर्षाचा गाळ असल्याने ड्रेजरने काढावा लागणार आहे. मुळातच सध्या नौका समुद्रात जाताना ज्या चॅनलने बाहेर पडतात तो अरुंद बनत चालला आहे. अगदी राजिवडा-भाट्ये पुलापासून हा सँण्डबार सुरु होतो. लाखो क्युबिक मीटर गाळ उपसून तो पुन्हा येऊ नये यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत.

नवीन मच्छीमारी हंगाम 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. विशेषत: नारळी पौर्णिमेनंतर नारळ अर्पण करुन खर्‍या अर्थाने मच्छीमारीस सुरुवात होते. या कालावधीनंतर समुद्र थोडा शांत झालेला असतो. त्यामुळे चालू हंगामात तरी हा गाळ उपसला जाईल की नाही अशी शंका मागील अनेक वर्षांच्या अनुभवावरुन मच्छीमारांना येत आहे. विशेषत: पालकमंत्री आणि मत्स्य विभागाने यात लक्ष घातल्यास भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न सुटू शकतो, अशा भावनाही मच्छीमारांनी व्यक्त केल्या.