जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कारांची नावे अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी जाहीर केली. यंदा प्रत्येक तालुक्यातील पुरस्कारासाठी दोन ते तीन प्रस्ताव प्राप्त झाले होते. गतवर्षी स्पर्धा न झाल्यामुळे विशेष पुरस्कार देण्यात आलेला नव्हता; मात्र यंदा 24 प्रस्ताव आलेले होते.

कोरोनामुळे अध्यक्ष बने आणि सभापती मोरे यांनी झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुरस्कारांमध्ये किशोर लिलाधर देवकर (ता. मंडणगड, शाळा पालघर), गणेश तुकाराम तांबिटकर (ता. दापोली, विसापूर शाळा), सुनिल अर्जुन तांबे (ता. खेड, घाणेखुंट नं. 2), श्रीमती वृषाली विजय सुर्वे (ता. चिपळूण, कात्रोळी देऊळ शाळा), प्रभाकर भिकाजी कांबळे (ता. गुहागर, मडाळ नं. 3), सुधीर जयराम सावंत (ता. संगमेश्‍वर, बोंडये), संजिवनी संदिप भावे (ता. कोतवडे, धामेळे), जनार्दन कमलाकर मोहिते (ता. लांजा, बेनी बुद्रुक नं. 1), मदन गुणाजी डोर्लेकर (ता. राजापूर, वाडीखूर्द), विशेष पुरस्कार ः विलास शंकर कानर (ता. संगमेश्‍वर, मोर्डे नं. 1) यांचा समावेश आहे.

आदर्श पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन एकच प्रस्ताव पाठविण्यात येत होता. त्यामुळे जिल्हास्तरावर होणार्‍या मुलाखती किंवा छाननीमध्ये स्पर्धा होत नव्हती. तालुकास्तरावरच सेटींग होत असल्याची चर्चा सुरु होती. तत्कालीन शिक्षण सभापती विलास चाळके यांनी प्रत्येक तालुक्यातून किमान दोन प्रस्ताव आलेच पाहीजेत अशा सुचना दिल्या होत्या. त्यावर्षी सर्वाधिक प्रस्तावही आले. गतवर्षी विशेष पुरस्कारासाठीच्या निकषात बसणारा एकही प्रस्ताव सादर झालेला नव्हता. त्यामुळे तो पुरस्कार कुणालाही दिला गेलेला नव्हता. शिक्षक पुरस्कार देताना योग्य प्रकारे छाननी केली जात असल्याचे यावरुन स्पष्ट झाले होते. यंदाही 24 प्रस्ताव आलेले होते. कोरोना कालावधीतही नियमांचे पालन करत त्या शिक्षकांच्या मुलाखती अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती सुनील मोरे, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या. त्यातून आदर्श पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची नावे निवडण्यात आली आहेत.

दरम्यान, शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबरला आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. गेल्या दोन वर्षात ही परंपरा पाळण्यात जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी ठरले आहे; परंतु यंदा कोरोनातील टाळेबंदीमुळे पुरस्कार जाहीर झाले असले तरीही वितरण कार्यक्रम अनिश्‍चित आहे.