मासेमारी आली अंगलट; मिऱ्या समुद्रात बुडता बुडता वाचला पुण्याचा पर्यटक

रत्नागिरी:-  जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या एका व्यक्तीला समुद्राच्या उधाणात वाहून जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. रहीम मिसाक्शीर असे या वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहीम मिसाक्शीर हे आपल्या मुलासोबत मिऱ्या येथील भारतीय शीपीयार्ड बोलाडजवळ मासेमारी करत होते. समुद्राला प्रचंड उधाण आलेले असतानाही, ग्रामस्थांनी पुढे न जाण्याचा सल्ला देऊनही त्यांनी तो ऐकला नाही. मासेमारी करत असताना अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने रहीम मिसाक्शीर समुद्रात पडले.

समुद्रातील लाटांच्या तडाख्याने ते किनाऱ्यावरील खडकांवर आपटत होते. त्याचवेळी देवदूतासारखे धावून आलेले स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण यांनी तात्काळ मदत करत त्यांना समुद्रातून बाहेर काढले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे रहीम मिसाक्शीर यांचा जीव वाचला.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कापडगाव येथील एका तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता. स्थानिक लोक धोक्याची सूचना देत असतानाही अनेकदा पर्यटक किंवा नागरिक दुर्लक्ष करतात, ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. सुदैवाने, आज मात्र ग्रामस्थांच्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.