गवाणे येथे फासकित अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान

लांजा:- डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गवाणे मावळतवाडी येथे घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नर जातीच्या बिबट्याला पिंजराबंद करण्यात आले.

दरम्यान, या घटनेने डुकरासारख्या प्राण्यांसाठी फासकी लावण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .या दृष्टीने आता वनविभाग कोणती भूमिका घेणार याकडे वन्य प्राणी मित्रांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याचा मानवी वस्तीकडे मुक्त संचार तसेच वन्य प्राण्यांवर हल्ले सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी वनगुळे येथे चार बिबटे एकाच वेळेस फिरताना दिसून आले होते. तर गवाणे गावांशमध्ये साधारणपणे १५ ते २० दिवसांपूर्वी एका बिबट्याचे मोठमोठ्याने ओरडणे ग्रामस्थांनी ऐकले होते. त्यानंतर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून पिंजरा लावावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली होती .मात्र त्याबाबत वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेले नव्हती.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी गवाणे मावळतवाडी या ठिकाणी असलेल्या जंगलमय भागात अज्ञात इसमाने डुकरासाठी फासकी लावलेली होती. या फासकीत हा नर जातीचा बिबट्या आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास अडकला होता. त्याचे ओरडण्याचा आवाज ऐकून याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून वन विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर वन वनविभागाचे अधिकारी सकाळी ९ वाजता घटनास्थळी दाखल झाले होते . यानंतर या बिबट्याला फासकीतून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास या बिबट्याची फासकीतून सुटका करण्यात आली .त्यानंतर त्याला पिंजरा बंद करण्यात आले. यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा पिंजरा घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आला.

हा बिबट्या नर जातीचा असून तो पूर्ण वाढ झालेल्या तीन वर्षांचा आहे. पावसामुळे फासकीचा फास जोरात लागत नसल्याने या बिबट्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याचे वनविभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई वनविभागाच्या विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी चिपळूण) गिरिजा देसाई, तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी -रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी (सामाजिक) राजापूर राजेंद्र पाटील, पाली वनपाल न्हानू गावडे, तसेच लांजा सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल महादेव पाटील ,राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, सामाजिक वनीकरण विभागात लांजाचे बाबासाहेब ढेकळे, वनरक्षक श्रीमती श्रावणी पवार ,वनरक्षक नमिता कांबळे, तसेच वनरक्षक सिद्धार्थ हिंगमिरे, तसेच प्राणी मित्र प्रतिनिधी दीपक कदम तसेच महेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी यासाठी मेहनत घेतली . दरम्यान पिंजरा बंद करण्यात आलेल्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.