अंतिम दोन दिवसात चाकरमान्यांचा जथ्था कोकणात दाखल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना सुरवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला; मात्र गणेश आगमन आणि त्यापुर्वीचा एक दिवस अशा दोन दिवसांमध्ये दोन हजार चाकरमान्यांचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. याला कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला आहे. सर्वाधिक चाकरमानी चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, कणकवली या चार स्थानकांवर उतरले.

कोरोनाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण जगभरात वाढत आहे. महाराष्ट्रात टाळेबंदी करण्यात आलेली असून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास अत्यावश्यक केला होता. त्यामुळे कोकणात येणार्‍या चाकरमान्यांच्या प्रवेशाबाबत सुरवातीला तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. राज्य सरकारनेही कोकणात येणार्‍यांना दिलासा देण्यासाठी गणेशोत्सवाला कोकणात येणार्‍यांना क्वारंटाईन कालावधी दहा दिवस केला होता. 1 ते 13 ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 51 हजार चाकरमानी दाखल झाले होते. ते सर्वच्या सर्व क्वारंटाईन झाले. 13 ऑगस्टनंतर कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसाला चार गाड्यांचे नियोजन केले होते; परंतु अटी-शर्थींमुळे प्रतिदिन येणारे प्रवासी दोनशे ते अडीचशे पर्यंत होते.

शनिवारी (ता. 22) गणेश आगमनासाठी कोकण रेल्वेने चाकरमान्यांनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला होता. आगमनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. 21) दिवसभरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच गाड्यातून एक हजार चाकरमानी गावाकडे आले. प्रत्यक्ष आगमनाच्या दिवशी चार गाड्यांमधून एक हजार प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. शासनाने एसटी आणि रेल्वेसाठी ई पास ची सुविधा रद्द केली आहे. कोकण रेल्वेच्या गाड्या आरक्षीत तिकिटांसाठीच आहे. अनारक्षित तिकिट असलेल्यांना स्थानकावरुन माघारी धाडण्यात येणार होते. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने आरक्षण फुल्ल झालेले नव्हते. आलेल्या प्रवाशांपैकी काहींनी बहूदा 48 तासांपुर्वी कोरोना चाचणी केल्याचा अहवाल आणला असण्याची शक्यता आहे. तसे केले नसेल तर त्यांना नियमानुसार दहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरीही प्रत्येक स्थानकावर चाकरमान्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आरोग्य पथकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणार्‍यांची नोंदणी करुन त्या-त्या गावी पाठविण्यात येत आहे.