जिल्ह्यातील सर्व साकवांचे होणार पुनःसर्वेक्षण

रत्नागिरी:- पुण्यातील इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनःसर्वेक्षण करणाच्या सूचना मुख्य कार्याकारी अधिकारी वैदही रानडे यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

पुण्यातील साकव दुर्घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील सर्व साकवांच्या बांधकामाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने साकवांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षणाची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये यावर्षी जिल्ह्यातील ६०८ साकव दुरुस्तीच्या पटलांवर आले आहेत. साकव दुरुस्तीचा नवा आकडा प्रशासन स्तरावरून लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक दुर्गम वाडीवस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मोठे वहाळ, नदीनाले, पऱ्यांवर साकव आहेत. अनेक ठिकाणी मुलांना शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसेच दळणवळणासाठी साकवांचा वापर होतो.