Wednesday, June 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस पंचक्रोशीत ढगफुटी सदृश्य पाऊस; गोळप येथे दरड कोसळली, पावस बाजारपेठेत पाणी भरले

पावस पंचक्रोशीत ढगफुटी सदृश्य पाऊस; गोळप येथे दरड कोसळली, पावस बाजारपेठेत पाणी भरले

पावस:- पावस पंचक्रोशीला शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात ढगफुटी सारखा पाऊस कोसळत होता. त्यामुळे पावस बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरल्याने अनेक दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोळप मानेवाडी येथे दरड कोसळल्याने पाच दुचाकी गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या होत्या त्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याच ठिकाणी राहणार्‍या सागर मोहिते यांच्या घराजवळच ही दरड कोसळल्याने घरामध्ये पाणी घुसून घरातील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावस पंचक्रोशीत दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी चार वाजल्यानंतर पावसाने पावस परिसरामध्ये दमदार बॅटिंग केली. विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या यादरम्यान पावस बाजारपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे व परिसरातील गटारी तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा बाजार पेठ परिसरामध्ये आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचबरोबर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यादरम्यान पावस बाजारपेठ येथील संतोष सुर्वे, फारुख मुकादम, मेहबूब टेमबरीकर, स्वप्निल खातू, तेज खातू, विकास वैद्य, अकबर इनामदार, रउफ सावकार, फजल सावकार, फकीर सावकार, महमूद हवालदार, अजिज हवालदार, रऊफ हवालदार, उस्मान हवालदार, मुसवीर नाखवा,शौकत नाखवा, सुनील खातू, गावखडीतील सत्यवान नानरकर, शिल्पेश पाटील,यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे व सदरचे दुकाने खाडी किनारी असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. नुकसानग्रस्त भागाची तलाठी चौगुले यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला यामध्ये सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे. या अचानकपणे भरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे या भागातील दुकानदार व रहिवासी रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन वावरत होते. 13 जून रोजी रात्री आठच्या दरम्याने अचानक आलेल्या वादळी पावसामध्ये गोळप मानेवाडी येथील साई मंदिराजवळ असलेल्या सागर मोहिते यांच्या घराजवळील दरड गाड्यांच्या शेड वरती कोसळल्याने पाच दुचाकी गाड्या ढिगाराखाली गाडल्या गेल्या होत्या तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे सागर मोहिते यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले होते. त्यामध्ये त्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे घटनास्थळी तलाठी मुरकुटे, पोलीस पाटील निलेश भाटकर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये घटनेचा पंचनामा केला त्यानंतर जेसीबीच्या साह्याने शेडमध्ये अडकलेल्या दुचाकींना ढिगार्‍या खालून बाहेर काढण्यात आले त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन या भागात पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याने येथील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे असे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सागर मोहिते यांच्यासह संजय आग्रे, संतोष मोहिते, रमाकांत मोहीते, समीर मोहीते, सुरज डोंगरे, राजेश डोंगरे, मुकुल माने यांचा यात समावेश आहे. या परिसरात 2019 मध्ये साई मंदिराजवळच घरांना तीन ते चार घरांना भेगा गेल्या होत्या आता डोंगराला लागून घर बांधलेल्या सागर मोहिते यांच्या घराजवळ दरड कोसळून घराला धोका निर्माण झाले आहे संरक्षक भिंती करिता शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. उपसरपंच संदीप तोडणकर यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.