गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

गणपतीपुळे:- तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आणि निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी चार जून रोजी एक दुर्मिळ डॉल्फिन (देवमासा) दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला.

दुपारच्या सुमारास येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांना वाळू मध्ये सुमारे चार फूट लांबीचा डॉल्फिन मासा  मृतावस्थेत पडलेला दिसला. येथील मृत डॉल्फिन मासा पाहून स्थानिक व्यावसायिक , ग्रामस्थ व अनेक पर्यटकांनी डॉल्फिनच्या दिशेने धाव घेतली. यावेळी डॉल्फिनच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमेचे स्पष्ट निशाण दिसत नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे आणि मृत्यू मागील कारण काय असावे,याची माहिती मिळालेली नाही. हा मृत डॉल्फिन मासा सुमारे चार फूट लांबीचा आणि किमान दहा ते बारा किलो वजनाचा असावा असा अंदाज स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांकडून व्यक्त करण्यात आला. या मृत डॉल्फिन माशाला गणपतीपुळे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावरून बाजूला आणून समुद्रकिनाऱ्यावरील जागेत अतिशय योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची कामगिरी केली .