रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराला आता प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची न.प.चे पाणी विभागाचे प्रभारी अधिकारी इंद्रजीत चाळके यांनी सांगितले. एप्रिलच्या २१ मेपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद होता. शीळ धरण पूर्णपणे भरले असल्याने ही कपात आता संपुष्टात आली आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मे महिन्यातच हे धरण पुर्णपणे भरुन ओंसडून वाहू लागले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात धरण भरल्यानंतर पाणीपुरवठा नियमीत होत होता. या वर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने प्रथमच मे महिन्यात पाणी कपात झालेले नाही. उलट मे महिन्यातच नियमित पाणीपुरवठा होणार आहे. रत्नागिरी शहरात सुमारे ११ हजार नळ जोडण्या असून या सर्व ग्राहकांना आता नियमित पाणी पुरवठा होणार आहे. धरणाच्या ठिकाणी उपकेंद्राचे काम अंतिम टप्यात आहे. शेवटचे काम होणे बाकी असून ज्यादिवशी हे काम करायचे असेल त्या सोमवारी मात्र पाणीपुरवठा मात्र बंद ठेवावा लागणार आहे.