ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक, ट्रॅव्हल्स चालक फरार

बोरीवलीहून गणपतीपुळेला जाणाऱ्या गाडीला दिली धडक

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कोडमठ येथील सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स ( डीडी०१/एक्स/९९३३) या गाडीने पाठीमागून कविता ट्रॅव्हल्स ( एमएच०४/एमएच/९६९६) या आयशर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कविता ट्रॅव्हल्सचे चालक रामेश्वर अर्जुन कराड (३०, रा. जय मातादी कंपाउंड, श्री जी कॉम्प्लेक्स, काल्हेर व्हिलेज, भिवंडी, ठाणे) यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कराड हे आपल्या ताब्यातील गाडीतून प्रवाशांना घेऊन बोरिवली ते गणपतीपुळे (रत्नागिरी) जात होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली असताना, मुंबई बाजुकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या माणिक ट्रॅव्हल्सच्या अज्ञात चालकाने ही धडक दिली.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमी प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. माणिक ट्रॅव्हल्सच्या फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.