Saturday, May 2, 2026
spot_img
Home राजकीय राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली: विनायक राऊत

राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली: विनायक राऊत

रत्नागिरी:- राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगार पोलिसांना आपले मित्र समजत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे दिली. वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना त्यांनी राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांची अस्वस्थता थांबली आहे. तसेच, कोकणातील सत्ताधारी आणि मंत्र्यांना इथल्या शेतकऱ्यांची कोणतीही पर्वा नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. धुळे गेस्ट हाऊसमध्ये ५ कोटी रुपये सापडल्याच्या मुद्यावरूनही राऊत यांनी टीकास्त्र सोडले. समिती गेल्यानंतर पाहुण्यांना पैसे देणे ही अत्यंत वाईट प्रथा असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या लांगूनचालनाचा आरोप

भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद असला तरी, शिंदे गटाने तत्वांना तिलांजली दिली असून ते भाजपचे लांगूनचालन करत आहेत, अशी तोफही राऊत यांनी डागली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एकदा तरी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करावा, म्हणजे त्यांना अधिकारी टक्केवारी घेण्यात कसे व्यस्त आहेत, हे समजेल, असे आव्हान राऊत यांनी दिले. प्रशासकांच्या हातात कारभार देऊन सध्या लूटमार सुरू असल्याचा आरोप करत, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण कधीही तयार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.