मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी झोडपले
रत्नागिरी:- जिल्ह्यात हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला झोडपून काढले. गुरुवारी सकाळी पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली होती. मात्र, दुपारनंतर पाऊस पुन्हा हजर झाला. सायंकाळी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवार 23 मे या कालावधीत रेड अलर्ट तसेच 24 व 25 मे या कालावधीत ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. 23 मे पर्यंत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 24 मे व 25 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत 43.45 छ्या सरासरीने 391 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात मंडणगड तालुक्यात 15.50 मिमी, खेड 43.14 मिमी, दापोली-18.42 मिमी, चिपळून 27.11 मिमी, गुहागर 42.20 मिमी, संगमेश्वर 82.33 मिमी, रत्नागिरी 63.44 मिमी, लांजा 54.60 मिमी आणि राजापूर तालुक्यात 44.37 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
22 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये मंडणगड तालुक्यात श्रीमती मनसुर अहमद पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून लागलेल्या आगीत नगरपंचायत घर क्र. 287/2 चे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून लाईट फिटींगचे नुकसान झाले आहे. शिरगाव येथे शिवराज विजय शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळीसरे येथे जगन्नाथ महादेव शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे दयानंद लिलाधर जाधव यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे प्रकाश तुकाराम जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.
सलग तिसऱ्या दिवशी देखील मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. वादळी वाऱ्याचा मोठा फटका किनारपट्टी भागातील ग्रामस्थांना बसला. वादळी वाऱ्यामुळे महावितरणला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी महावितरणचे पोल पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
वादळी पावसाने मासेमारी तीन दिवसांपासून ठप्प
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. मासेमारी हंगाम संपुष्टात येण्यासाठी अवघे आठ दिवस हाती असताना आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता पासूनच मच्छीमारांनी खलाशांना परत पाठवत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली आहे.








