कोळंबे येथे जांभळे काढताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथे जांभळे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या एका २७ वर्षीय मजुराचा पाय घसरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक विलास पवार (२७, व्यवसाय-मजूर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २० मे रोजी चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक विलास पवार हा प्रवीण अनंत दामले, कोळंबे यांच्याकडे मजुरीचे काम करत होता. नेहमीप्रमाणे ते १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कोळंबे, खांबाचा मळा येथे जांभळाच्या झाडावर जांभळे काढण्यासाठी चढला होता.

जांभळे काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि तो खाली जमिनीवर पडला. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला, उजव्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने गावातील लोकांनी उपचारासाठी प्रथम रत्नागिरी येथील साफल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी येथे हलवण्यात आले. मात्र, २० मे रोजी रात्री १२.०८ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान दीपक पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पूर्णगड पोलीस अधिक तपास करत आहेत.