लांजाः– तालुक्यातील गोविळ येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. जोरदार पाऊस सुरू असताना झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघांवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत राजेश चिमाजी जाधव (वय ४५, रा. गोविळ बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर चंद्रकांत पवार (वय ३५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश जाधव आणि समीर पवार हे दोघे बुधवारी सकाळी मुंबईहून मोटारसायकलने आपल्या गावी, गोविळ येथे येत होते. सायंकाळी गोविळमध्ये पोहोचल्यानंतर ते आपल्या घराकडे जात असताना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघांनीही रस्त्यालगतच्या एका झाडाखाली आश्रय घेतला. दुर्दैवाने, सायंकाळी ५.३० वाजता जोरदार वीज कडकडली आणि ती थेट या दोघांच्या जवळच कोसळली. या भीषण दुर्घटनेत राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी समीर पवार यांनी तातडीने गावात धाव घेत लोकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या समीर पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश जाधव यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण गोविळ गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









