रेल्वेला तुफान गर्दी, समुद्रकिनारे गजबजले
रत्नागिरी:- मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईस्थित कोकणवासीय चाकरमानी गावी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी आहे. तर जिल्ह्यातील समुद्रकिनारे देखील पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
मुंबईहून येणार्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल गर्दीने धावत असून खेड, चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे. मुंबईहून गावी येणार्या तसेच परतीच्या प्रवासाचे रेल्वेचे तिकीट बुकिंगही महिनाभर आधीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना तत्काळ तिकिटासाठी धावाधाव करावी लागत आहे. कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने बरेच जण वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यात धन्यता मानत आहेत.
कोकणातील विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मुंबई, पुणे व अन्य भागात नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. एप्रिल-मे महिन्यात गावागावातील मंदिरात धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांना दरवर्षी चाकरमानी हजेरी लावतात. गेल्या महिन्यात शालेय मुलांच्या परीक्षा संपल्याने मुंबईकर चाकरमानी आपल्या मूळ गावी कुटुंबासह दाखल होऊ लागले आहेत.
कोकण रेल्वेसह एसटी बसेस, खासगी आराम बसेस तसेच अन्य खासगी गाड्यांनी मुंबईकर गावी दाखल होत आहेत. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांसह सुट्टी कालावधीत सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग महिनाभर अगोदरच फुल झाले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये चाकरमान्यांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. बरेच जण तत्काळ तिकीट बुकिंग करून प्रवास करीत आहेत, मात्र ही तिकिटे मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही जण तर कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने वेटिंग तिकिटावरच प्रवास करीत आहेत. खेड, चिपळूण या प्रमुख रेल्वे स्थानकांसह जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानके चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजत आहेत. त्याचबरोबर एसटी बसस्थानकांवरही चाकरमानी प्रवाशांची गर्दी होत आहे.
मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम संपल्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी गावी आलेले मुंबईकर चाकरमानी पुन्हा गावाहून मुंबई, पुणे व अन्य भागात रवाना होतात. त्यासाठी परतीच्या प्रवासाची आरक्षण तिकिटेही अगोदरच बुकिंग करण्यात आली असून परतीच्या गाड्यांचेही बुकिंग फुल्ल झाले आहे.
बरेच चाकरमानी स्वतःच्या खासगी वाहनांनी गावी दाखल होत आहेत. खासगी आराम बसेस, अन्य खासगी वाहनांनीही चाकरमानी गावी दाखल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढत आहे. मुंबईहून कोकणात येणार्या खासगी आराम बसचा प्रवास महागला आहे.









