एसटीला जर टिकवायचं असेल तर तिला सांभाळायला पाहिजे

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

रत्नागिरी:- महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लालपरी एसटी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल तर तिला सांभाळायला पाहिजे. बसस्थानक न थुंकता स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची देखील आहे. ही जबाबदारी देखील प्रवाशांनी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा कदाचित जाहीर झालेला नसला तरी भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पर्यटक येणारा जिल्हा कुठचा आहे तर तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, शशिकांत चव्हाण, बंड्या साळवी, यांच्यासह अपर जिल्हाधिकारी गलांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, एमआयडीसी अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुतन इमारतीच्या प्रवेशद्वाराचा शुभारंभ करण्यात आला. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यानंतर द्विपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी निर्माण ग्रुप, एमआयडीसीचे अधिकारी यांचे एसटी महामंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी ना. सामंत यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक केले. दापोली आगारासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. मंत्री भरत गोगावले यांनीही ना. सामंत यांच्या कामगिरीचे कौतुक करताना आपल्या महाड मतदार संघासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. व्हीजन असलेले नेतृत्व रत्नागिरीकरांना लाभले असल्याचे गौरवोदगारही त्यांनी ना. सामंत यांच्याबद्दल काढले.

यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना ना. सामंत यांनी सासंगितले की, 2013पासून या एसटी स्टॅण्डचे तीन वेळा भूमिपूजन केले. सरकार बदलले की नव्याने भूमिपूजन परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या उद्योगमंत्रीपद मिळाल्यानंतर खर्‍या अर्थाने या बसस्थानकाच्या कामाला गती मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योग मंत्री केलं नसतं तरी रत्नागिरीकरांच स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नसतं आणि म्हणून या व्यासपीठावरनं जेवढा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ शिंदे निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले.  हे बस स्थानक बघितल्यानंतर लक्षात येईल की आपण प्रवाशांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पण जो माझा कर्मचारी दिवसभर त्या एसटीचे सगळा नियोजनबद्ध कारभार बघतो, एसटी चालवतो प्रवाशांना चांगल्या सुखसोयी देतो त्याच्याकडे बघत असताना आपण कर्मचार्‍यांसाठी वातानुकलीत कक्ष उभारला आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं बसस्थानक आहे. महिलांसाठी महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक हिरकणी कक्ष जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला रत्नागिरीच्या बस स्थानकामध्ये यावे लागेल एवढी महिला भगिनींची देखील आम्ही काळजी घेतली आहे.

रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहेत. भगवती बंदर किल्ल्यावर चढताना उंच पायर्‍यांमुळे वृध्द लोकांना त्रास होतो. ही समस्या समोर आल्यानंतर आपण एक कोटी रुपये मंजूर करुन याठिकाणी लिफ्टची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरीकर यांच्या आशीर्वादाने बसस्थानक उभे राहिलेा आहे. याठिकाणी स्थानिक कोकणी प्रोडक्ट विकण्यासाठी लॉटरीपध्दतीने हे गाळे दिले जाणार आहेत. संगमेश्वर एसटी बसस्थानकाचे उद्घाटन पुढील महिनाभरात केले जाणार असून माजी आमदार राजन साळवी यांनी लांजा येथील बसस्थानकाची समस्या समोर आणली आहे. येथील आमदार किरण सामंत, राजन साळवी व अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन तेथील कामाला गती देण्यात येईल. पुढील वर्षी याच तारखेला त्या बसस्थानकाचा शुभारंभ केला जाईल असेही त्यांनी सांगितले.