रेवस-रेड्डी सागरी महामार्ग; महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सर्वेक्षण
रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर काळबादेवी येथे फ्लायओव्हर ब्रिज उभारण्यावर ग्रामस्थ सकारात्मक झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर पूल उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १९ एप्रिलला काळबादेवी येथील ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये चर्चा केल्यानंतर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सागरी महामार्गाची नवीन अलायनमेंट कशी असेल याची माहिती दिली. कागदावरील नकाशाही ग्रामस्थांना दाखविण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांना कोणती शंका असल्यास विचारा असे अधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. काही ग्रामस्थांनी प्रश्नही उपस्थित केले. मात्र या नवीन पर्यायाला विरोध झालेला नव्हता. त्या बैठकित पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांची घरे जाणार नाहीत असा पर्याय सर्वांपुढे ठेवला असल्याचे सांगितले होते. बैठक पूर्ण झाल्यानंतर लगेचच आठवडाभरात एमएसआरडीसीकडून नव्याने सुचविलेल्या पर्यायाबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. काळबादेवी खाडीकिनाऱ्यापासून रामेश्वर मंदिर, भोवारी मार्गे हा रस्ता बनविण्यात येणार आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा पूल उभारण्यात येणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वेक्षणासाठी चार दिवस लागले. अलायनमेंट निश्चित केल्यानंतर पूलाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्याला लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, काळबादेवी येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन पर्यायाचे सर्वेक्षण झाले असले तरीही येथील काही ग्रामस्थांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. पूल उभारल्यानंतर त्याचा पर्यटनदृष्ट्या ग्रामस्थांना काहीच फायदा होणार नाही, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.









