कृषी सहाय्यकांचे आजपासून आंदोलन

कृषिमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद

गुहागर:- कृषी सहाय्यकांच्या अडचणी सोडविण्याचे १५ दिवसांत आश्वासन कृषिमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ५ मेपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात होईल. १५ मेपर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास १५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी या पूर्वी आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन १५ दिवसांत मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजपर्यंत मागण्यांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करा. सर्व कामकाज डिजिटल स्वरूपात होत आहे, त्यामुळे लॅपटॉप द्यावा. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा. निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतूद करा. कृषी विभागाच्या आकृतिबंधास तत्काळ मंजुरी द्या. कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांना पदोन्नती द्या. पोकरा योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरा. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करा. सिल्लोडमधील कृषी सहाय्यकांच्या आत्महत्येची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.