तिसऱ्या फेरीअखेर आरटीई अंतर्गत ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

रत्नागिरी:-  तालुकानिहाय आरटीई पात्र शाळा, तेथील रिक्त जागा आणि प्राप्त अर्ज शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. जिल्ल्यात या आरटीई प्रवेशाच्या एकूण असलेल्या ७९७ रिक्त जागांपैकी तिसऱ्या फेरीअखेर ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या प्रक्रियेत निवड झालेल्या १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवलीय त्यामुळे जिल्ह्यात २५७ जागांवरील प्रवेश शिल्लक राहिले आहेत.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी खासगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या

विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १४ जानेवारीपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली.

जिल्ह्यातून या प्रवेशासाठी असलेल्या ९१ शाळोमधील एकूण ७९७ जागांसाठी ९०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या यादीत ६०४विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्या यादीतील ४७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यानंतर, पहिल्या यादीतील निवड झालेले ८० विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर होते. त्यापैकी ५९ विद्यार्थ्याचे प्रवेश करण्यात आले. तर निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीत १३ विद्यार्थी होते. त्यानंतरही दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील ७ विद्यार्थी होते. या साऱ्या प्रक्रियेत एकूण ३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रक्रियेला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तिसऱ्या फेरीअंती एकूण ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अजूनही या प्रवेशाच्या एकूण २५७ जागा शिल्लक राहिल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन ते तिसऱ्या फेरीअंती झालेले एकूण प्रवेश आणि अजूनही शिल्लक राहिलेल्या जागांमध्ये चिपळूण-११३ प्रवेश व ७१ जागा शिल्लक, दापोली-५० प्रवेश व १९ जागा शिल्लक, गुहागर-२० प्रवेश व २ जागा शिल्लक, खेड-१२१ प्रवेश व ६२ जागा शिल्लक, लांजा-८ प्रवेश व १३ जागा शिल्लक, मंडणगड-२० प्रवेश व ३ जागा शिल्लक, राजापूर-७प्रवेश व २० जागा शिल्लक, रत्नागिरी-१८० प्रवेश व ४९ जागा शिल्लक, संगमेश्वर-२१ प्रवेश व १८ जागा शिल्लक आहेत. तीनवेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतले नसल्याचे पहायला मिळत आहे.