मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद
रत्नागिरी:- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते , विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि शेकडोच्या संख्येने रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत शोक व्यक्त केला. ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले की, या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तीला आपण सर्वजण ठेचून काढू तसेच सर्व नागरिकांनी एकता दाखवून विश्वास वृद्धिंगत करायला हवा. केंद्र सरकार या हल्ल्याचे प्रत्युत्तर नक्की देईल. येणाऱ्या काळात दहशतवादावर सरकार तीव्र कारवाई करेल.
पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला, ही अतिशय गंभीर बाब असून या विरोधात आपण सर्वांनी अशीच एकजुट दाखवण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व लोक नागरिक म्हणून एका छताखाली आलो आहोत, हीच आपली एकीची ताकद असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
तसेच यावेळी कर्नल प्रशांत चतुर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बशीर मुर्तुजा, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, वाहन निरीक्षक आरटीओ कार्यालय, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पदाधिकारी, मेडिकल कॉलेज विद्यार्थी, जिल्हा शासकीय रुग्णालय नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आणि शेकडो संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत याठिकाणी काश्मीर हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी संपूर्ण टीम उपस्थित होती.