धक्कादायक; कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण :- कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कामथे रुग्णालयात घडली. 6 ऑगस्टला संबंधित रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास हॉस्पिटलच्या गच्चीवर लोखंडी गजाला गळफास घेत या रुग्णाने आत्महत्या केली. कोरोनाची लागण झाल्याने आलेल्या नैराश्यातून या रुग्णाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. 

संबंधित रुग्णाने हॉस्पिटलमधल्या चादरीने गळफास घेतला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती म्हात्रे यांनी पोलिसांना खबर दिली. आत्महत्या केलेला रुग्ण चिपळूण मधील आंबडस, खेड गावचा रहिवासी असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कोविडच्या भीतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची चिपळूण पोलिसांनी माहिती दिली. कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.