बांधकाम साईटवर लिफ्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे बाजारपेठ येथे एका बांधकाम साईटवर काम करत असताना लिफ्ट अचानक कोसळल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमेशकुमार बनसीनाथ योगी (वय ३८, रा. गडकनीत, ता. श्रीमाधपुर, जि. सिकर, राजस्थान) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशकुमार योगी हे गेल्या पाच वर्षांपासून टाईल्स फिटिंगचे काम करत होते. कोतवडे बाजारपेठेत अनिल बाळकृष्ण घैसास यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथे काम करत असताना योगी हे लिफ्टमध्ये होते. अचानक लिफ्ट तुटल्याने ते लिफ्टसह तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.