खेडशी येथे भटक्या कुत्र्यांनी ‘त्या’ वासरावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी:- शहरातील खेडशी येथील मातोश्रीनगर परिसरात वासराचे तुटलेले अवशेष हे तेथील भटक्या कुत्र्यांनी त्या वासरावर हल्ला केल्यामुळे आढळून आल्याचा प्राथमिक अंदाज तेथील स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांकडून वर्तवला जात आहे. परंतू त्या वासराचे अवशेष ग्रामीण पोलिसांनी कोल्हापूर येथील सहायक वैज्ञानिक संशोधन प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वासराच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यास मदत मिळणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

दरम्यान शनिवारी रात्री वासराचे अवशेष मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक घटनास्थळी एकटवले होते. त्यांनी घटनास्थळीच अवशेषांचा पंचनामा करा, अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावले. हे अवशेष एका नवजात वासराचे असल्याचे तिथेच स्पष्ट झाले. याप्रकरणी विशाल पटेल यांनी प्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात शनिवारी रात्री 12.45 वा.सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.

चौकट – कुत्र्यांनी हल्ला केल्याची दुसरी घटना?
काही महिन्यांनी एमआयडीसी येथील रेल्वे पुलाजवळील झाडीतही जनावरांचे काही अवयव मिळून आले होते. ते भटक्या कुत्र्यांनी तिथे आणून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर नऊ महिन्यांनी पुन्हा खेडशी येथेही असाच प्रकार घडला असून या वासरावही भटक्या कुत्र्यांनीच हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.