स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
चिपळूण:- चिपळूण एस.टी. स्टँड ते चिंचनाका मार्गावर भोगाळे येथील चिपळूण शॉपिंग सेंटरसमोर झालेल्या दुचाकी अपघातात एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात ८ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात १४ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला (वय ४३, रा. खेडी, ता. चिपळूण) ही त्यांच्या प्लेजर दुचाकी ( MH-08-S-0292) वरून चिंचनाक्याकडून चिपळूण बस स्थानकाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी, समोर असलेल्या स्प्लेंडर दुचाकीला भरधाव वेगात ओव्हरटेक करताना त्यांच्या प्लेजर गाडीची स्प्लेंडरला बाजूने धडक बसली. यामुळे प्लेजरवरील महिलेचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. त्याच क्षणी, चिंचनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ॲक्सेस दुचाकी ( MH-08-AW-1895 ) ला प्लेजरची धडक बसली, ज्यामुळे ॲक्सेसवरील रोहन रमेश धांगडे (वय २१, रा. शिरगाव, ता. चिपळूण) आणि रेश्मा रमेश धांगडे (वय ५०, रा. शिरगाव, ता. चिपळूण) हे दोघेही खाली पडून जखमी झाले.
या अपघातात प्लेजर चालवत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवण्यामुळे हा अपघात झाला, ज्यात त्यांची स्वतःची प्राणहानी झाली, तसेच साक्षीदार जखमी झाले आणि दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले, असे फिर्यादी पोलीस हवालदार प्रितेश प्रकाश शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २८१ (सार्वजनिक मार्गावर धोका निर्माण करणे), १२५(अ) (वाहतूक नियमांचे उल्लंघन), १२५ (य) (सुरक्षिततेची काळजी न घेणे) आणि मोटर वाहन कायद्याचे कलम १८४ (धोकादायकपणे वाहन चालवणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.