किनारी भागात वेगवान वारे, पाण्याला देखील करंट
रत्नागिरी:- गेले दोन दिवस जिल्ह्यातील रहिवासी श्रावणधारांचा अनुभव घेताना दिसत आहे. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी (ता. 12) दुपारनंतर अचानक वारे वाहु लागल्याने समुद्राच्या पाण्याला प्रचंड करंट निर्माण झाल्याने मासेमारीसाठी गेेलेल्या नौका सुरक्षितरित्या बंदराकडे परतल्या आहेत.
बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 38.96 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 42.60 मिमी, दापोली 40.20 मिमी, खेड 43.50 मिमी, गुहागर 35.60 मिमी, चिपळूण 45.50 मिमी, संगमेश्वर 40.30 मिमी, रत्नागिरी 28.40 मिमी, राजापूर 30.60 मिमी, लांजा 43.90 मिमी पाऊस झाला. 1 जुनपासून आजपर्यंत 1,842 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के पाऊस झाला.
सोमवारी एक दिवस मुसळधार पाऊस झाला. दुसर्याच दिवशी जोर ओसरला आणि कडकडीत उन पडले. बुधवारी सायंकाळपर्यंत तशीच परिस्थिती होती. जिल्ह्यात काही ठिकाणी श्रावणधारा सुरु होत्या. विश्रांती घेत पाऊस पडत होता. रत्नागिरी तालुक्यात दुपारपर्यंत उन होते. दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि ढग भरुन आले. किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहू लागले. सकाळच्या सत्रात शांत राहीलेला समुद्र दुपारनंतर खवळला होता. सायंकाळी हलका पाऊसही सुरु झाला होता. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मच्छिमारीवर झाला.
हंगाम सुरु झाल्यानंतर वातावरणाचा रोख लक्षात घेऊन मच्छीमारी 10 ते 15 वावात सुरक्षित राहून मासेमारी करत आहेत. गेल्या चार दिवसात शेकडो मच्छीमारी नौका समुद्रात जाऊ लागल्या आहेत. कोळंबी, पापलेटसह वेगवेगळी मासळीचे दहा ते पंधरा टप (एक टप 32 किलोचा) प्रत्येक बोटीला मिळतात. त्यात दोन ते तीन टप पापलेट मिळत आहे. मासळीला पाहीजे तेवढा दर मिळत नसल्याने मच्छीमारांची अडचण झाली आहे. ना नफा ना तोटा अशी मासेमारी सध्या सुरु आहे. त्यातच दुपारनंतर वारे वाहू लागल्यामुळे वातावरण बदलले आणि समुद्रात गेलेल्या नौका किनार्याकडे वळल्या. काहींनी जवळच्या बंदरावर आसरा घेतला आहे. मिरकरवाडा, जयगड, हर्णे, नाटे परिसरातील शेकडो नौका समुद्रात मासेमारीला ये-जा करत आहेत.