कारवांचीवाडी येथे कार- एसटी बस अपघातात तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजिकच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन ५ कर्मचारी चेंबूर(मुंबई) ते रत्नागिरी असे निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कारवांचीवाडी फाटा येथे आली असता समोरून येणार्‍या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर जखम झालेल्या विकास नवसरे (वय ३४, रा. मुंबई) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्याप्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता.

नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता. तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. मध्यरात्री १२ वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. कारवांचीवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडीचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे समोरासमोर ठोकर झाली.

हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहायला आले होते. मात्र सकाळच्यावेळी त्यांच्या कारला अपघात होऊन युनिट मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.