वीजबिल वसुलीसाठी कंपनीची पथके सक्रिय
रत्नागिरी:- वीजबिल वसुलीमध्ये अव्वल असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला आता थकबाकीने ग्रासले आहे. जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ ग्राहकांकडे तब्बल २० कोटी २ लाखांची महावितरणची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची वसुली पथके सक्रिय झाली आहेत. कठोर कारवाई करत काही ठिकाणी वीजजोडणी तोडण्यात आली आहे.
महावितरण कंपनीने इतर राज्य आणि जिल्ह्याच्या तुलनेत उत्तम वसुली, थकबाकी नाही, वीजगळती आणि चोरी नाही यामुळे रत्नागिरी जिल्हा भारनियमनातून कायम मुक्त राहिला होता. थकबाकी नाही हे त्यातील प्रमुख कारण होते; मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. जिल्ह्यात कोरोना महामारीनंतर थकबाकीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्षअखेर जवळ आल्याने आता वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक थकबाकीदारांकडे जाऊन बिल भरण्यासाठी सूचना करत आहेत. जिल्ह्यात घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, पथदीप, सार्वजनिक पाणीपुरवठा, शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वाढली आहे.
पथदीपांची १० कोटी थकबाकी
सर्वाधिक थकबाकी सर्वच ठिकाणच्या पथदीपांची आहे. जिल्ह्यातील १६३० स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदीपांसाठीची १० कोटी १४ लाखांची थकबाकी आहे. दरवर्षी ३१ मार्चपर्यंत बिले भरण्यात येत असल्यामुळे येत्या काही दिवसांतही थकबाकी भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘महावितरण’तर्फे ग्राहकांना अखंडित विजेचा पुरवठा करण्यात येऊनही काही ग्राहक वीजबिले वेळेवर भरत नसल्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणची वसुली पथके कार्यरत आहेत. वीज ग्राहकांनी वसुली पथकांना सहकार्य करत बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे.
-वैभव पाथोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण