पाटगावमधील तरुणाचा मलकापूर येथे दुचाकी अपघातात मृत्यू

देवरुख:- पाटगाव गवंडीवाडी येथील तरुणाचा मलकापूर येथे दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अमर अशोक पांचाळ (२२) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी पाटगाव स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.

अमरचे मूळ संगमेश्वर गाव तालुक्यातील नांदळज. कामानिमित्त पांचाळ कुटुंबिय अनेक वर्षे पाटगाव गवंडीवाडी येथे वास्तव्याला आहेत. शनिवारी अमर व रोशन लिंगायत हे कामानिमित्त मलकापूर येथे दुचाकीने गेले होते. सायंकाळी पुन्हा घराच्या दिशेने परतत असताना दुचाकीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अमर पांचाळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात रोशन लिंगायत याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरचा मृतदेह रविवारी सकाळी पाटगाव गवंडीवाडी येथे आणण्यात आला. अमर हा शांत व प्रेमळ स्वभावाचा, कष्टाळू होता. तो रंगकाम करत असे. क्रिकेट, कबड्डी खेळाची त्याला आवड होती. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.