संजय राऊत दिशाभूल करणाऱ्या बातम्या देतात: खासदार नारायण राणे

रत्नागिरी:- भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “संजय राऊतला चांगलं दिसत नाही. तो ज्या बातम्या देतो, त्या सगळ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असतात,” असा आरोप करत राणेंनी राऊत यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत हे सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतात. यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. काही दिवस ते शांत होते, पण आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राऊत यांना हे सहन होत नाही आणि म्हणूनच ते नकारात्मक शब्द वापरतात. आम्ही त्यांना कधीतरी चांगलं बोलायला शिकवू,” असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई-गोवा महामार्गावर पावसापूर्वी मोठ्या प्रमाणात काम पूर्ण होणार

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कोकणवासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, येत्या पावसाळ्याच्या आत महामार्गाच्या मोठ्या भागाचे काम पूर्ण होईल, असे ठेकेदाराने आश्वासन दिल्याची माहिती राणे यांनी दिली.

त्यांनी नमूद केले की, “मुंबई-गोवा महामार्ग कोकणातील जनतेसाठी महत्त्वाचा असून, सरकारही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बहुतांश कामाचा ताण हलका होईल.”